सिग्नलच्या पलीकडे मोठ्या अलिशान दुकानांची रांग होती. दुकानांच्या स्वच्छ चकचकीत काचांवरून पावसाचं पाणी ओघळून वाहत होतं. दुकानातले दिवे, माणसं, कपडे, समान, बिंदी सगळी चकचकीत दुनिया पाण्याबरोबर वाहून जातेय असं वाटत होतं. दुकानाच्या दरवाजात महानगरपालिकेने कित्येक वेळा अतिक्रमण कारवाई करून, काढून टाकलेले छत होतं. अवेळी पावसानं घात केलेले काही जण तिथे खो ळंबून थांबले होते. “पाऊस भी धरून राहिलाय… मीबी जाऊ का तिकडं?”, चकचकीत दुकानाबाहेरच्या छताकडे बघत बिंदीने विचार केला. “पर ह्यो दुकानदार बोलला तर? मागं अशीच थांबल्ये तर एक दुकानदार वसकन अंगावर आला. काय काय ऐकीवलंन मला! मला बाहेर उभी पाहून, ह्यांचं कष्टम्बर य्येत न्हाईत म्हणे. जाऊ दे न राईलं…” मनातला विचार झटकून बिंदी तशीच अवघडून उभी राहिली. अंग थोडं भिजलंच होतं. थंडी वाजत होती. चौकाच्या टोकाला एक चहाची हातगाडी उभी होती. हातगाडीला हातगाडीवाल्यानं, हातगाडीच्या छपराला दोन्ही बाजूला दोन काठ्या व त्यावर ताडपत्री टाकून ते अजून वाढवलं होतं. त्याला अतिक्रमणवाल्यांची त्याला भीती नव्हती. गिर्हाईक ताडपत्रीखाली उभे राहून चहा पीत होते. चहाबरोबर क...