हल्ली असं एक म्हणायची प्रथा रूढ झालीये.. लोकांना अलीकडे वाचायलाच आवडत नाही, म्हणे. आणि किंडलवगरे प्रकार आल्यापासून तर पुस्तकांची विक्रीच होत नाही. पण हे वास्तव नाही हे दाखवून देणारी काही ठिकाणं आजही आहेत.. न्यूयॉर्कला जेव्हा केव्हा जायला मिळतं तेव्हा तिथं भेट द्यायच्या यादीत एक नाव सर्वप्रथम असतं. स्ट्रँड बुक स्टोअर. त्या महानगराची आकर्षणं अनेक आहेत. स्ट्रँडचं पुस्तक दुकान हे त्या अनेकांमधल्या पहिल्या काहींतलं. अगदी भर मॅनहटनला ब्रॉडवेच्या रस्त्यावर हे दुकान आहे. रस्त्याच्या कोपऱ्यावरती. इंग्रजीतल्या एल अक्षरासारखा हा कोपरा पसरलाय. या दुकानाचं आकर्षण फक्त दुकान हे नाही. तर दुकानाचा एल अक्षरात पसरलेला पदपथसुद्धा तितकाच आकर्षक आहे. पुस्तकप्रेमींच्या जगात या पदपथाचं महत्त्व अनन्यसाधारण. कारण पुस्तकं तिथूनच भेटायला सुरुवात होते. एक डॉलर, दोन डॉलर ते पाच डॉलर अशा दराच्या चिठ्ठय़ा दोन दोन फुटी कपाटांवर तिथं लावलेल्या असतात. म्हणजे त्यातलं कोणतंही पुस्तक एक डॉलरला वगरे असं. आणि ही फडताळं सर्व बाजूंनी फिरणारी. चारही बाजूंनी त्याला पुस्तकं लगडलेली. जुनी. त...