Skip to main content

पाऊस


सिग्नलच्या पलीकडे मोठ्या अलिशान दुकानांची रांग होती. दुकानांच्या स्वच्छ चकचकीत काचांवरून पावसाचं पाणी ओघळून वाहत होतं. दुकानातले दिवे, माणसं, कपडे, समान, बिंदी सगळी चकचकीत दुनिया पाण्याबरोबर वाहून जातेय असं वाटत होतं. दुकानाच्या दरवाजात महानगरपालिकेने कित्येक वेळा अतिक्रमण कारवाई करून, काढून टाकलेले छत होतं. अवेळी पावसानं घात केलेले काही जण तिथे खोळंबून थांबले होते.
“पाऊस भी धरून राहिलाय… मीबी जाऊ का तिकडं?”, चकचकीत दुकानाबाहेरच्या छताकडे बघत बिंदीने विचार केला. “पर ह्यो दुकानदार बोलला तर? मागं अशीच थांबल्ये तर एक दुकानदार वसकन अंगावर आला. काय काय ऐकीवलंन मला! मला बाहेर उभी पाहून, ह्यांचं कष्टम्बर य्येत न्हाईत म्हणे. जाऊ दे न राईलं…” मनातला विचार झटकून बिंदी तशीच अवघडून उभी राहिली. अंग थोडं भिजलंच होतं. थंडी वाजत होती.
चौकाच्या टोकाला एक चहाची हातगाडी उभी होती. हातगाडीला हातगाडीवाल्यानं, हातगाडीच्या छपराला दोन्ही बाजूला दोन काठ्या व त्यावर ताडपत्री टाकून ते अजून वाढवलं होतं. त्याला अतिक्रमणवाल्यांची त्याला भीती नव्हती. गिर्हाईक ताडपत्रीखाली उभे राहून चहा पीत होते. चहाबरोबर कांदा भजी आणि वडेही होते. पाऊस होता.. त्यामुळे धंदा चांगला होता.
“भूक लागलीय… पोटात आग पडलीय… सकाळपासून काईबी खाल्लं नाई…. समोरच्या हातगाडीकडून चहा घेऊ का?… अंगातली थंडीबी जाईल. पर पैसे कुटे हाईत? कालचं पाच रूपयं सोडलं तर काही उरला न्हाई. पाच रुपये चाहत संपले तर रातच्याला काय खानार? आत्ता खाल्लं तर रातच्याला परत भूक लाग्येल….” चहाच्या हातगाडीकडे न बघण्याचा प्रयत्न करत बिंदी बसून राहिली. पावसानं सगळी पाठ भिजली होती… “जाऊ… नको राऊ द्ये….”

अर्धाएक तास झाला. हातगाडीचा, चहाचा, पैशाचा विचार करत बिंदी तळमळत बसली होती. पाऊस चांगलाच लागला होता. थंडीत खूप वेळ बसणं बिंदीला असह्य झालं होतं. धावतच तिनं रस्ता ओलांडला. हातगाडी वाल्याला कटिंग सांगितला. तिच्याकडे एकदा बघून हातगाडीवाला कामात मग्न झाला. बिंदी हातगाडीवरच्या स्टोव्हपाशी उभी राहिली. स्टोव्हची गर्मी तिला प्रफुल्लीत करून गेली. आपण पावसात भिजतोय ह्याचा तिला विसर पडला.

कटिंग हातात मिळाल्यावर, बिंदीला बरं वाटलं. हातगाडीवाल्याला पैसे देऊन, वाफाळलेल्या चहाचा ग्लास तिने तोंडाला लावला. आजूबाजूला माणसं होती. टायवाली… स्वच्छ कपड्यातली…. तिच्या खूप जवळ उभी असलेली पण तिच्या खूप दूर असलेली.. कुणी चहा पीत होतं… कुणी गप्पा मारत होतं.. कुणी वडे खात होतं… कोणी बिंदीला नोटीस केलं नाही… बिंदीने तरी त्यांना कुठे नोटीस केलं म्हणा. तीही तिच्याच चहात गुंतली होती. एक घोट घेतला तेवढ्यात “एह्ह लडकी अंदर खडी रेह..” ह्या आवाजानं ती भानावर आली. हातगाडीवाला तिला ताडपत्री खाली उभं राहायला सांगत होता. काहीशी अनिच्छेनीच ती ताडपत्रीखाली उभी राहिली. चहा मस्त होता. “अमृततुल्य” नसला तरी तिला बास होता.

“एह येह पकड..”. हातगाडीवाल्यानं काहीतरी कागदात गुंडाळलेलं पुढं करून म्हणलं. बिंदीने वर पाहिलं. “हं ले..” असं म्हणत त्याने हात पुढं केला. काही न बोलता बिंदीने पुडा हातात घेतला. हातगाडीवाला परत कामात व्यस्त झाला. पुडा हाताला गरम लागला म्हणून तिने उत्साहाने उघडला. हातगाडीवाल्याने त्यात काही भजी आणि एक वडा दिला होता…. बिंदीला शब्द फुटेना… तशी शब्दांची गरज नव्हती… तिने काही म्हणावं म्हणून तिला ते दिलेलं नव्हतंच मुळी!

Comments

Popular posts from this blog

निर्धार - कुसुमाग्रज : Nirdhar Kusumagraj

समरभूमिचे सनदी मालक शतयुद्धांचे मानकरी रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||ध्रु.|| घोरपडीला दोर लावुनी पहाड़ दुर्घट चढलेले, तुटून पङता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले, खंदकांतल्या अंगारावर हासत खेळत पडलेले, बाप असे कळिकाळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||१|| या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची, पहाड़ डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव येथे लढवय्यांच्या सदा शिरी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||२|| करवत कानस कुणी चालतो पिकवो कोणी शेतमळा, कलम कागदावरी राबवो धरो कुणी हातात तुळा, करात कंकण असो कुणाच्या वा भाळावर गंधतिळा, शिंग मनोय्रावरी वाजता उभी छावणी घरोघरी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||३|| पोलादी निर्धार आमुचा असुर बळाची खंत नसे, स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजयावाचुन अंत नसे, श्रद्धा ह्रदयातील आमुची वज्राहुनी बलवंत असे, मरण मारुनी पुढे निघाले गर्व तयांचा कोण हरी ? रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? |...

देणा-याने देत जावे

देणा-याने देत जावे  घेणा-याने घेत जावे  हिरव्या पिवळ्या माळावरुनी  हिरवी पिवळी शाल घ्यावी  सह्याद्रीच्या कड्याकडून  छातीसाठी ढाल घ्यावी  वेड्यापिशा ढगाकडून  वेडेपिसे आकार घ्यावे  रक्तामधल्या प्रश्नासाठी  पृथ्वीकडून होकार घ्यावे  उसळलेल्या दर्याकडून  पिसाळलेली आयाळ घ्यावी  भरलेल्या भिमेकडून  तुकोबाची माळ घ्यावी  देणा-याने देत जावे  घेणा-याने घेत जावे  घेता घेता एक दिवस  देणा-याचे हात घ्यावे  -विंदा करंदीकर

लढलो कसे? लढू कसे?

मराठाकालीन लढायांपासून ते ‘गोवामुक्ती’पर्यंतच्या मोहिमांचा अभ्यास करून ‘सेनादलांच्या संपूर्ण क्षमतांचा आपण कधी वापरच केला नाही’, किंवा ‘तीन सेनादलांत अधिक संवाद हवा’, असे परखड निष्कर्ष काढणारे पुस्तक अलीकडेच प्रकाशित झाले आहे. एका विद्यमान हवाईदल अधिकाऱ्यांनी ते लिहिले असल्याने त्याचे महत्त्व अधिक आहे.. भारताच्या स्वातंत्र्यानंतर झालेल्या युद्धांवर आजपर्यंत स्वतंत्रपणे आणि विस्तृत बरेच लिखाण झाले आहे. पण त्यात प्रामुख्याने तात्कालीन सेनाधिकाऱ्यांनी आपापल्या अनुभवांवर आधारित, काहीशा मर्यादित दृष्टिकोनातून लिहिलेली वर्णने आहेत. विद्यापीठीय पंडित आणि लष्करी अधिकारी या दोन्ही प्रकारच्या लिखाणात समग्र दृष्टीचा अभाव जाणवतो. त्यातही लष्करी इतिहास (मिलिटरी हिस्टरी) या दृष्टीने भारतात आजवर फारसे लिखाण झालेले नाही. परदेशांप्रमाणे मिलिटरी हिस्टरी ही विद्याशाखाही भारतात नावारूपास आलेली नाही. अगदी सेनादलांच्या आणि रेजिमेंट्सच्या नोंदींमध्येही सातत्य आणि परिपूर्णता नाही. तसेच त्या-त्या वेळच्या कारवाया आणि युद्धांतून घेतलेले धडे संकलित करून त्यातून एक राष्ट्रीय धोरण (डॉक्ट्रिन) तयार करण्याचा प...