Skip to main content

किताबें करती हैं बातें बीते जमाने, की दुनिया की, इंसानों की

किताबें करती हैं बातें बीते जमाने की
दुनिया की, इंसानों की
आज की, कल की
एक एक पल की..
किताबें कुछ कहना चाहती हैं
तुम्हारे पास रहना चाहती हैं..’


सफदर हाश्मींच्या या कवितेत पुस्तकं काय काय म्हणतात ते पुढे विस्ताराने मांडलंय. एकंदरच सुसंस्कृत माणसाच्या मनात पुस्तकांकरिता एक वेगळा कोपरा असतो. पुस्तकांना मनात आणि घरातही राहायचं आहे. पण खरंच आजकाल पुस्तकांना जागा असते? त्यांना घर असतं? ग्रंथदिन जवळ आला की माझ्या मनातली लहानशी सल अधिकच खुपायला लागते. अनेक प्रसंग आठवतात आणि वस्तुस्थितीही अस्वस्थ करीत असते.
एक प्रसंग साधासाच! माझ्या एका मैत्रिणीच्या घराचा पुनर्विकास झाला. नव्या फ्लॅटमध्ये राहायला जाताना तिने विचारलं, ‘तुझ्या ग्रंथालयात चांगली पुस्तकं आणून देऊ  का? घराच्या नव्या सुशोभीकरणात त्यांना जागा मिळेलसं दिसत नाही.’ हे विचारताना तिला त्रास होत होता. आणि तिला एकदम ‘हो’ म्हणता येत नाही याचा मलाही त्रास होत होता. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या विलेपाल्र्याच्या शाखेची मी अध्यक्ष आहे. ग्रंथांसाठी जागा नेहमी कमीच पडते. त्यामुळे ग्रंथपालांशी बोलून कोणती पुस्तकं घेता येतील ते ठरवण्यासाठी मैत्रिणीच्या पुस्तकांची यादी घेऊन मी संग्रहालयात आले. त्याच वेळी एका लहानशा गावात ग्रंथालय चालवणारे एक गृहस्थ आले होते. त्यांना पुस्तकं देणगी म्हणून मिळाली तर हवी होती. आमच्याप्रमाणे त्यांनाही पैशांची चणचण दिसत होती. मैत्रिणीच्या पुस्तकांच्या यादीवर आम्हाला हव्या असलेल्या पुस्तकांवर खुणा केल्या. उरलेल्यांपैकी त्यांना हवी ती पुस्तकं निवडण्यासाठी यादी त्यांच्या हवाली केली. यादी झरझर वाचत ते म्हणाले, ‘ताई, आमच्या गावात कादंबऱ्या, कथासंग्रह, आत्मचरित्रं हवी असतात. ही पुस्तकं वाचली जायची नाहीत. मग ती नेऊन जागा कशाला अडवू?’
त्या विविध विषयांवरच्या पुस्तकांना मैत्रिणीकडे, ग्रंथसंग्रहालयाकडे, गावातल्या छोटय़ा ग्रंथालयात जागा नव्हती. त्यांना घरच नव्हतं. ती अगदी रस्त्यावर आली असती तरी कुणी घेतली असती का? त्यांचा मृत्यू मला जाणवत होता. जीव कासावीस होत होता. त्यातली काही मी घरी नेली, तरी!
लगोलग आणखी एक घटना घडली. आमच्या ग्रंथसंग्रहालयाचे एक वयस्क सदस्य खूप आजारी झाले. त्यांनी ग्रंथपालांना फोन केला, ‘ग्रंथसंग्रह खूप आहे. तुम्ही तो न्याल का? माझ्या पश्चात त्याची रद्दी होईल.’ हे म्हणताना त्यांना खूप कष्ट होत असणार. कोणत्याही ग्रंथसंग्राहकाला आपल्या पुस्तकांबद्दल फार ममत्व असतं. त्यांना घराबाहेरचा रस्ता दाखवताना जीव किती थोडा थोडा होत असेल?
किताबें कुछ कहना चाहती हैं, तुम्हारे पास रहना चाहती हैं.. पण त्यांच्यासाठी घर हवं. कुठे आहेत घरं? कुठे आहेत ग्रंथगृहं? याच्या अगदी विपरीत अनुभव मंजिरी वैद्य हिने सांगितला. ती लोकमान्य सेवा संघाच्या ग्रंथालयाची ग्रंथपाल. ती म्हणाली, ‘लोक देणगी म्हणून शनिमहात्म्याच्या पोथीपासून वाट्टेल ती पुस्तके आणतात. रद्दीऐवजी देणगी म्हणून देऊन पुण्य मिळेल असं वाटतं की काय कुणास ठाऊक!’ एकंदर काय, सगळी अनास्थाच!
ग्रंथपालन शास्त्राच्या पदवी परीक्षेची आमची पहिलीच तुकडी! आमच्या विद्युत खांडवाला मॅडम पुस्तकांच्या बाबतीत फार संवेदनशील होत्या. महिला विद्यापीठाच्या ग्रंथालयात आम्हा विद्यार्थिनींना काहीएक प्रमाणात मुक्तद्वार होतं. एकदा त्यांनी एका विद्यार्थिनीला पुस्तक खस्सकन् ओढून घेताना पाहिलं. त्यांनी तिला म्हटलं, ‘थांब. पुस्तक कसं काढावं ते तुला दाखवते. बाजूचं पुस्तक थोडं आणखी बाजूला सार. या पुस्तकाच्या वरच्या बाजूला बोट ठेवून ते तिरकं कर आणि अलगद काढ. त्याच्या कण्याला धरून खस्सकन् ओढू नको. पानं सैल पडतील. तुझ्या मुलाला कुणी बकोट धरून ओढलं तर चालेल का? आणि वाचताना पानं खुणेसाठी दुमडू नका.’
मॅडमना काय म्हणायचं आहे ते आम्हाला चांगलंच कळलं. टाटा मूलभूत विज्ञान संशोधन संस्थेच्या ग्रंथालयाचे ग्रंथपाल डॉ. वजिफदार आमच्या वर्गावर मानद प्राध्यापक म्हणून येत. त्यांनी एकदा आम्हाला त्यांचं ग्रंथालय बघायला नेलं. ग्रंथांना किती सुरेख ऐसपैस जागा! महत्त्वाच्या ग्रंथांचं, संशोधनवृत्तांचं मायक्रो फिल्मिंग केलं होतं. आगीमुळे त्या ग्रंथांचं नुकसान होणार नाही अशी व्यवस्था केली होती. वाचनालय प्रशस्त होतं. सुरेख टेबलं, उत्तम खुच्र्या, प्रत्येक आसनासमोर टेबल लॅम्प, समोरची भिंत लख्ख काचेची! त्यातून सुंदर प्रकाश येत होता. विद्यार्थी अभ्यासात गढून गेले होते. स्वर्ग स्वर्ग तो हाच असं आम्हाला तेव्हा वाटलं. इथे ग्रंथही आनंदाने दीर्घकाळ जगत असणार!
आम्हाला इंग्लिश शिकवायला येणारे डॉ. महिषी सांगायचे, ‘परकीय आक्रमण झालं की पहिला हल्ला ग्रंथालयांवर होतो. कारण माणसाची स्वातंत्र्याची इच्छा तेवत ठेवणारे विचार तिथे असतात. ग्रंथालये फार महत्त्वाची असतात. आता परकीय आक्रमणांची गरज उरली नाही. ग्रंथालये बंद पडण्याचं प्रमाण वाढलं आहे. तरुण पिढीशी यासंदर्भात बोललं की त्यांचं म्हणणं असतं.. याबाबतीत इतकं ‘सेन्टी’  (भावनाविवश) होण्याची गरज नाही. आम्हाला अगदी मोबाइलवरसुद्धा पुस्तकं डाऊनलोड करता येतात. किंडल, टॅब्लेट, संगणक वगैरे आणखी प्रगत विद्युत माध्यमं आहेतच.
ती माध्यमं घेऊन तळ्याकाठी झाडाच्या बुंध्याला टेकून पुस्तक वाचताना कुणाला पाहिलं नाही. आरामखुर्चीत बसून एका हातात कॉफीचा मग धरून संगणकावर पुस्तक वाचताना निदान मी तरी कुणाला पाहिलं नाही. चार पुस्तकं समोर ठेवून संदर्भ काढता येतात, तसे चार मोबाइल समोर ठेवून संदर्भ काढीत टिपणं करताना कुणा संशोधक, लेखकालाही मी  पाहिलेलं नाही. नेटवरच्या लेखांची अस्सलता तपासायला पुष्कळदा पुस्तकांचा आश्रय घ्यावा लागतो. ग्रंथालयात अगदी मामुली वर्गणीत पुस्तकं उपलब्ध होतात. नेटवर पुष्कळदा पैसे मोजावे लागतात.
इंदिरा संत यांची एक सुरेख कविता आहे. त्यात एका कडव्यात त्या म्हणतात-
‘पुस्तकातली खूण कराया दिले एकदा पीस पांढरे
पिसाहुनी सुकुमार काहीसे देता घेता त्यात थरारे’
पुस्तकाचा स्पर्श, त्यातून आलेली वस्तू, त्यातील नाजूक भाव हे सारं अन्य माध्यमांतून कसं मिळणार?
एकंदरीतच ग्रंथालयांची, पुस्तकांची आबाळ चालली आहे. जुनी महत्त्वाची पुस्तकं जीर्ण होतात. त्यांचं पुनर्मुद्रण होत नाही. जीर्ण पुस्तकांची छायाप्रत काढता येत नाही. ग्रंथालयांचे खर्च वाढत आहेत. वाळवी लागू नये म्हणून, पुस्तकं भिजू नयेत म्हणून काळजी घ्यायची, पडक्या, गळक्या जागेची दुरुस्ती करायची, पुस्तकांच्या वाढत्या किमतींना तोंड द्यायचं; अन् वर वर्गणी वाढली की सदस्य नाखूश होणार! या सगळ्यातून वाट काढत ग्रंथगृहे तग धरून असतात.
कधी कधी मात्र एकदम दिवा उजळल्यासारखं होतं. काही महिन्यांपूर्वी डहाणूकर महाविद्यालयाचा परशुराम खवले संग्रहालयात आला. ज्यांना पुस्तकं हवी आहेत त्यांच्यापर्यंत ती पोहोचवण्याचा एक प्रकल्प त्याने हाती घेतला होता. ग्रंथालयाच्या पहिल्या तत्त्वाशी हे खूप सुसंगत होतं. प्रत्येक पुस्तकाला त्याचा वाचक असतो आणि प्रत्येक वाचकाला त्याचं पुस्तक असतं. ग्रंथालयाने त्यांची गाठभेट घडवून आणायची असते. परशुरामने पुस्तके गोळा करण्याची काही स्थळे निश्चित केली होती. आमच्या ग्रंथालयाचं सहकार्य त्याला हवं होतं. आम्ही अर्थातच सर्व सहकार्य देऊ  केलं. त्याने एक मोठा खोका ठेवला. त्यात वाचकांनी खूप पुस्तकं टाकली. सगळी पुस्तके त्याने पुस्तकांसाठी उत्कंठित असलेल्या लोकांपर्यंत पोहोचवली. महाविद्यालयाच्या प्राचार्याचाही भक्कम पािठबा त्याला लाभला. प्रकल्पासाठी त्याने एक लघुपटही बनवला. पुस्तके मिळाल्यावर लोकांचे चेहरे कसे उजळले, हे सांगताना त्याचाही चेहरा उजळला होता.
पुस्तकं विकत घेऊन वाचून त्यावर चर्चा करणारा रजनी वेलणकर आणि त्यांच्या मैत्रिणींचा एक गट गेली बारा-तेरा वर्षे नेमाने जमतो. उत्कर्ष मंडळाची पुस्तक भिशी, घेतलेल्या पुस्तकांवर चर्चा, पुस्तकांची एकमेकींशी अदलाबदल हा उपक्रम अव्याहत चालू आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या विलेपार्ले शाखेचं वाचक चर्चा मंडळ नेमाने जमतं. अनेक ग्रंथ भेट म्हणून मिळतात. अशी काही प्रकाशाची बेटं इथे तिथे चमकतात. त्यांनी नवनव्या पुस्तकांना आपल्या घरात सामावून घेतलं असतं.
ग्रंथांवर प्रेम करणाऱ्यांचं एक स्वप्न असतं. एक ऐसपैस ग्रंथालय. भरपूर ग्रंथसंपदा. तिथे निवांत बसून वाचावं. ग्रंथालयाला जोडून लहानसा हॉल असावा. तिथे लेखक-वाचकांचा राबता असावा. चहा-कॉफीच्या कपांबरोबर त्यांच्या चर्चा, गप्पा चालाव्यात. तिथे ग्रंथविषयक कार्यक्रम व्हावेत.
हे स्वप्न पुरं होईल अशी आशा करायची. एरवी सध्या ग्रंथांवर हेच म्हणण्याची वेळ आलीय.. ‘कुणी घर देता का घर? विचारांचं, साहित्य-संस्कृतीचं भांडार असलेल्या ग्रंथांना घर हवंय, घर..’
Credit - माधवी कुंटे  madhavikunte@gmail.com​

Comments

Popular posts from this blog

निर्धार - कुसुमाग्रज : Nirdhar Kusumagraj

समरभूमिचे सनदी मालक शतयुद्धांचे मानकरी रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||ध्रु.|| घोरपडीला दोर लावुनी पहाड़ दुर्घट चढलेले, तुटून पङता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले, खंदकांतल्या अंगारावर हासत खेळत पडलेले, बाप असे कळिकाळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||१|| या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची, पहाड़ डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव येथे लढवय्यांच्या सदा शिरी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||२|| करवत कानस कुणी चालतो पिकवो कोणी शेतमळा, कलम कागदावरी राबवो धरो कुणी हातात तुळा, करात कंकण असो कुणाच्या वा भाळावर गंधतिळा, शिंग मनोय्रावरी वाजता उभी छावणी घरोघरी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||३|| पोलादी निर्धार आमुचा असुर बळाची खंत नसे, स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजयावाचुन अंत नसे, श्रद्धा ह्रदयातील आमुची वज्राहुनी बलवंत असे, मरण मारुनी पुढे निघाले गर्व तयांचा कोण हरी ? रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? |...

देणा-याने देत जावे

देणा-याने देत जावे  घेणा-याने घेत जावे  हिरव्या पिवळ्या माळावरुनी  हिरवी पिवळी शाल घ्यावी  सह्याद्रीच्या कड्याकडून  छातीसाठी ढाल घ्यावी  वेड्यापिशा ढगाकडून  वेडेपिसे आकार घ्यावे  रक्तामधल्या प्रश्नासाठी  पृथ्वीकडून होकार घ्यावे  उसळलेल्या दर्याकडून  पिसाळलेली आयाळ घ्यावी  भरलेल्या भिमेकडून  तुकोबाची माळ घ्यावी  देणा-याने देत जावे  घेणा-याने घेत जावे  घेता घेता एक दिवस  देणा-याचे हात घ्यावे  -विंदा करंदीकर

लढलो कसे? लढू कसे?

मराठाकालीन लढायांपासून ते ‘गोवामुक्ती’पर्यंतच्या मोहिमांचा अभ्यास करून ‘सेनादलांच्या संपूर्ण क्षमतांचा आपण कधी वापरच केला नाही’, किंवा ‘तीन सेनादलांत अधिक संवाद हवा’, असे परखड निष्कर्ष काढणारे पुस्तक अलीकडेच प्रकाशित झाले आहे. एका विद्यमान हवाईदल अधिकाऱ्यांनी ते लिहिले असल्याने त्याचे महत्त्व अधिक आहे.. भारताच्या स्वातंत्र्यानंतर झालेल्या युद्धांवर आजपर्यंत स्वतंत्रपणे आणि विस्तृत बरेच लिखाण झाले आहे. पण त्यात प्रामुख्याने तात्कालीन सेनाधिकाऱ्यांनी आपापल्या अनुभवांवर आधारित, काहीशा मर्यादित दृष्टिकोनातून लिहिलेली वर्णने आहेत. विद्यापीठीय पंडित आणि लष्करी अधिकारी या दोन्ही प्रकारच्या लिखाणात समग्र दृष्टीचा अभाव जाणवतो. त्यातही लष्करी इतिहास (मिलिटरी हिस्टरी) या दृष्टीने भारतात आजवर फारसे लिखाण झालेले नाही. परदेशांप्रमाणे मिलिटरी हिस्टरी ही विद्याशाखाही भारतात नावारूपास आलेली नाही. अगदी सेनादलांच्या आणि रेजिमेंट्सच्या नोंदींमध्येही सातत्य आणि परिपूर्णता नाही. तसेच त्या-त्या वेळच्या कारवाया आणि युद्धांतून घेतलेले धडे संकलित करून त्यातून एक राष्ट्रीय धोरण (डॉक्ट्रिन) तयार करण्याचा प...