रतन टाटा यांच्यानंतर टाटा उद्योगसमूहाचे चार वर्षांपूर्वी निवडले गेलेले उत्तराधिकारी सायरस मिस्त्री यांची नुकतीच अध्यक्षपदावरून तडकाफडकी गच्छंती करण्यात आली. त्यावरून सध्या आरोप-प्रत्यारोपांचे रणकंदन सुरू आहे. टाटा समूहाचा आजवरचा आदर्श, मूल्याधिष्ठित कारभार आणि नावलौकिक याला हे खचितच साजेसे नाही. मोरारजी देसाई पंतप्रधान असतानाची ही गोष्ट. त्यांचे आणि जेआरडी टाटा यांचे संबंध कधीच सौहार्दाचे नव्हते. पन्नासच्या दशकात मोरारजी मुंबईत संयुक्त प्रांताचे मुख्यमंत्री असताना जेआरडींच्या वीज कंपनी प्रयत्नांना त्यांचा विरोध होता. मुंबईला विजेची गरज नाही, असं देसाई यांनी टाटांना सुनावलं होतं. मोरारजी केंद्रीय अर्थमंत्रीही होते. तो लायसन राजचा काळ. सरकार ज्यात त्यात नाक खुपसायचं. त्यावेळी टाटा स्टीलला- म्हणजे तेव्हाची टिस्को- समभाग बाजारात आणायचे होते. तर त्याची किंमत किती असावी, हेसुद्धा मोरारजी देसाई यांनाच ठरवायचं होतं. त्यावरनंही त्यांनी जेआरडी टाटांची कोंडी केली. आणि पुढे पंतप्रधान झाल्यावर देसाई यांनी जेआरडींना टाटा मूलभूत संशोधन संस्था (टी. आय. एफ. आर.), अणुऊर्जा आयोग अशा सगळ्याच संस्थां...