मराठाकालीन लढायांपासून ते ‘गोवामुक्ती’पर्यंतच्या मोहिमांचा अभ्यास करून ‘सेनादलांच्या संपूर्ण क्षमतांचा आपण कधी वापरच केला नाही’, किंवा ‘तीन सेनादलांत अधिक संवाद हवा’, असे परखड निष्कर्ष काढणारे पुस्तक अलीकडेच प्रकाशित झाले आहे. एका विद्यमान हवाईदल अधिकाऱ्यांनी ते लिहिले असल्याने त्याचे महत्त्व अधिक आहे.. भारताच्या स्वातंत्र्यानंतर झालेल्या युद्धांवर आजपर्यंत स्वतंत्रपणे आणि विस्तृत बरेच लिखाण झाले आहे. पण त्यात प्रामुख्याने तात्कालीन सेनाधिकाऱ्यांनी आपापल्या अनुभवांवर आधारित, काहीशा मर्यादित दृष्टिकोनातून लिहिलेली वर्णने आहेत. विद्यापीठीय पंडित आणि लष्करी अधिकारी या दोन्ही प्रकारच्या लिखाणात समग्र दृष्टीचा अभाव जाणवतो. त्यातही लष्करी इतिहास (मिलिटरी हिस्टरी) या दृष्टीने भारतात आजवर फारसे लिखाण झालेले नाही. परदेशांप्रमाणे मिलिटरी हिस्टरी ही विद्याशाखाही भारतात नावारूपास आलेली नाही. अगदी सेनादलांच्या आणि रेजिमेंट्सच्या नोंदींमध्येही सातत्य आणि परिपूर्णता नाही. तसेच त्या-त्या वेळच्या कारवाया आणि युद्धांतून घेतलेले धडे संकलित करून त्यातून एक राष्ट्रीय धोरण (डॉक्ट्रिन) तयार करण्याचा प...